Description
या काव्यसंग्रहात श्री ज्ञानेश्वरांपासून मर्ढेकरांपर्यंतच्या पंचवीस मराठी कवींच्या कविता समाविष्ट आहेत. `कविता हे सर्व ज्ञानपुष्पांचे अत्तर आहे`, अशा अर्थाचे उद्गार वर्डस्वर्थने काढले आहेत. या संग्रहातील प्रत्येक कविता वाचताना अभ्यासकांना कमीअधिक प्रमाणात या उक्तीचा प्रत्यय येईलच, पण या अत्तरात नुसता मधुर सुगंध नसतो, त्यातून जीवन उजळणारे अग्निकणही बाहेर पडतात हे पाहून त्यांना सानंद आश्चर्य वाटेल. झाडांना जशी पाने येतात तशी कविता सुचायला हवी असे कीट्स म्हणत असे. अशी जीवनातून स्फुरलेली आणि नव्या जीवनाला स्फूर्ती देणारी कविता या संग्रहात निश्चितच आहे. या काव्यवाटिकेत विविध वृक्ष डौलाने उभे आहेत. त्यांची उंची, फांद्या, पाने, फुले आणि फळे यांच्यात अनेक साम्यविरोध आढळतील, पण ते तादृश महत्त्वाचे नाहीत. आजचे मानवी जीवन रखरखणाऱ्या उन्हातून चालणाऱ्या माणसाप्रमाणे त्याच त्या जुन्यापुराण्या कंटाळवाण्या रस्त्याने चालले आहे. त्या जीवनाला या वाटिकेतल्या रम्य, शीतल छायेत क्षणभर विसावा मिळेल. एवढेच नव्हे तर उपवन आणि तपोवन यांचा संगम साधणाऱ्या या भूमीत विश्रांती घेताघेता ते नव्या जीवनधर्माची पाऊलवाट चोखाळण्याची स्वप्ने पाहू लागेल.
Reviews
There are no reviews yet.