Description
‘कन्टेजन’ ही डॉ. रॉबिन कुक यांची वैद्यकीय पाश्र्वभूमीवरील एक यशस्वी रहस्यमय कादंबरी. विज्ञानाच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित ‘इंटेलिजंट’ गुन्हेगारांची टोळी, त्यांची असाधारण गुन्हेगारी व एका बुद्धिमान, निष्ठावंत व्यक्तीनं ती हाणून पाडण्यासाठी जिवाच्या करारानं घेतलेला त्याचा शोध, या पद्धतीनं गुंफलेलं हे कथानक अत्यंत उत्कंठावर्धक मांडणीमुळे वाचकांच्या मनाचा ठाव घेतं. न्यू यॉर्कच्या मॅनहटन जनरल हॉस्पिटलमध्ये कोणत्यातरी अज्ञात संसर्गजन्य रोगानं एकापाठोपाठ एक माणसं मरू लागतात. मुख्य वैद्यकीय तपासनीस ऑफिसातील गुन्हाअन्वेषण विभागातील निष्णात डॉक्टर जॅक स्टेपलटन शवविच्छेदन केल्यावर चक्रावून जातो…! हा घातक संसर्गजन्य रोग कोणता? इन्फ्ल्युएंझा?… प्लेग?… टुलरेमिया?… रॉकी माउंटन स्पॉटेड फिव्हर?… ७०-७५ वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या या रोगांचे विषाणू पुन्हा या काळात आणि तेही न्यू यॉर्कमधल्या इतक्या अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये? हे विषाणू नैसर्गिकपणे उद्भवले, की कोणा माथेफिरू दहशतवाद्याचं हे कृत्य? जॅक हात धुऊन या प्रकरणाच्या मागे लागतो. नॅशनल बायॉलॉजिकल्स… फ्रेझर लॅब… अलास्कातील गोठलेले एस्किमो… शेवटी काय असतं याच्या मुळाशी? अत्यंत नाट्यपूर्ण घडामोडींनी श्वास रोधायला लावणारी ही कादंबरी. या वैज्ञानिक शक्यता कोणत्याही देशात, कोणत्याही काळात प्रत्यक्षात येऊ शकतील, या जाणिवेनं मनाचा थरकाप होतो, हेच डॉ. रॉबिन कुक यांचं यश आहे.
Reviews
There are no reviews yet.