Description
काहूर ही कथा आहे, एका जंगली लू जमातीतील मुलीची- जी आयुष्यात चांगल्या गोष्टीच्या शोधात असते. ‘ना गा’ असे नाव असणाऱ्या या मुलीचे भावविश्व लेखकाने उलगडून दाखविले आहे. ना गा केवळ सात वर्षांची असताना पिकांचे झालेले नुकसान, हलाखीची आर्थिक परिस्थिती यामुळे वडिलांनी तिला विकून टाकले आहे. दरू गावातील मुखियाकडे सुरुवातीला घरकाम करण्यासाठी ‘ना गा’ राहत असताना मुखियाची बायको तिला खूपच वाईट वागणूक देत असते. वयाच्या मानाने कठीण कामे करून मालकिणीच्या नजरेत वर येण्याचा ती खूप प्रयत्न करत असे; परंतु ना गा मालकिणीच्या दृष्टीने एक अुशभ मुलगी असल्यामुळे, कधीच यशस्वी होऊ शकणार नाही हे आता तिला कळून चुकले होते. रंगूनमध्ये एका कुटुंबाची सेवा करणाऱ्या डो डो सेंगने ना गाला कजाग मालकिणीच्या तावडीतनं सोडवलं आणि आपल्याचबरोबर रंगूनला घेऊन गेली. मूळ अमेरिकन असलेल्या या कुटुंबातील मॉर फॉर आणि पिया यांनी ना गाला जीव लावला. तिला आपल्या घरातील सदस्यासारखीच वागणूक दिली. परंतु जेव्हा अमेरिकेला जाण्याची वेळ आली तेव्हा ना गा आणि डो डो सेंग यांना त्यांनी सोबत नेलं नाही. अमेरिकेला जाण्याचं स्वप्न तुटलेली डो डो सेंग ना गा ला घेऊनच गावी परतली. ना गा म्हणजे तिचं अमेरिकेला जाण्याचं तिकीट होतं; परंतु जेव्हा बेत फसला, तेव्हा आता डो डो सेंग तिला घालून पाडून बोलू लागली. आपल्या दुर्दैवाला अप्रत्यक्षरीत्या ना गा कारणीभूत आहे, असे तिला वाटू लागले. डो डो सेंगने आपल्याला दाखवलेले सुखाचे दिवस, उपकार लक्षात ठेवून पैसा मिळवून तिला सुख देता यावे म्हणून एका व्यक्तीवर विश्वास ठेवून ती नोकरीच्या निमित्ताने थायलंडला पोहोचते. लवकरच तिच्या लक्षात येते की, आपण फसवले गेलो आहोत. कामाच्या बहाण्याने तिची रवानगी एका कुंटणखान्यात होते. विचित्र, यातनामय आयुष्य जगत असताना तिच्या आयुष्यात विल येतो. अतिशय सभ्य सुसंस्कृत असणारा विल ना गाच्या प्रगतीसाठी, सुखासाठी खूप प्रयत्न करतो. ना गा आणि विल यांच्यात नात्याचा नाजूक बंध निर्माण होतो. बायको नसूनही बायकोप्रमाणे त्याची सेवा करणारी ना गा नकळतपणे त्याच्या प्रेमात पडते. पण तिचा पत्नी म्हणून स्वीकार करण्यास विल तयार नसतो. दहा वर्षं एकत्र राहिल्यावर एक दिवस विल तिला पुन्हा तिच्या घरी जाण्याविषयी सुचवतो. विलला मिळवण्याचे सर्व प्रयत्न करून थकलेली ना गा डोक्यात विचारांचे काहूर माजलेले असतानाच परतण्याची इच्छा नसतानाही वाँटिंगच्या प्रवासाला निघते. काही चमत्कार घडावा, विलने आपल्याला थांबवावे असे मनात म्हणत परतत असताना तिला सुरक्षित घरी पोहोचण्यासाठी विलने अनेक माणसांची व्यवस्था केलेली असते. या परतीच्या मार्गावर तिला अनेक कटू-गोड अनुभव येतात. आपल्या उद्ध्वस्त घराचा अनिच्छेने शोध घेण्यासाठी ती वाट चालू लागते.
Reviews
There are no reviews yet.