Description
दृढनिश्चयी वृत्तीच्या, महत्त्वाकांक्षी स्त्रीची ही सत्यकथा आहे. `कुंती` (नाव बदलले आहे.) काहीशा सनातनी वातावरण असलेल्या परिवारात जन्म. लहानपणापासून नृत्य-संगीताची आवड. पण तिचे वडील डॉ. गजेंद्रप्रसाद त्याविरुद्ध. त्यासाठी कुंतीला घराबाहेर जायलाही मज्जाव करणारे डॉक्टर स्वतः मात्र स्त्रीसहवासाचे शौकीन. मद्यपानाचीही सवय. आपण पसंत करू त्याच्याशीच तिने लग्न केले पाहिजे हा अट्टाग्रह. मणिभद्र नामक तरुण गजेंद्रप्रसादांचा कम्पाउन्डर. बराच छेलबटाऊ. कुंती अठरा वर्षांची असतानाच कुंतीची आई निधन पावलेली. त्यामुळे घरातले सर्व व्यवहार कुंतीच पाहते. डॉ. चा राग, मद्यपान सहन करते. तरुण, देखण्या कुंती त व मणिभद्रमध्ये घनिष्ट संबंध निर्माण होतात. त्यातून तिला दिवस जातात. ती भयंकर घाबरते. मणिभद्रला लग्नाबद्दल सुचवते; पण लुच्चा मणिभद्र गुपचूप पळून जातो. निराश होऊन कुंती न सांगता घर सोडते व जीव देण्यासाठी शहरातल्या तलावाकडे निघते. पण उदरातील गर्भाच्या विचारात तिचे मन पालटते. अपत्याला जन्म देऊन वाढवण्याचा निर्धार करते. शहरातल्याच महिला आश्रमात आधार घेते. संचालिका सरलाबेन- कुंतीच्या आईची खास मैत्रीण. त्या तिला आश्रय देतात, तिची काळजी घेतात. आश्रमाचे एक उदार आधारस्तंभ अशा हरिराजस्वामींची कुंतीशी भेट होते. हरिराजस्वामींच्या तेजस्वी व्यक्तीमत्त्वाने व विलक्षण आपुलकीमुळे ती भारावून जाते. ठरल्या दिवसापेक्षा काही काळ आधीच कुंती मुलाला जन्म देते. नाव ठेवते `कर्ण`– अपुऱ्या दिवसांचा असूनही कर्ण प्रकृतीने चांगला असतो. आश्रमाच्या नियमानुसार विवाहापूर्वी झालेले बालक मातेजवळ ठेवता येत नाही, दत्तक द्यावेच लागते. पण सरलाबेन कर्ण सहा महिन्यांचा होईतोपर्यंत थांबतात. अखेरीस नियम सांगतात. कुंती कडाडून कर्णाला दत्तक देण्याबाबत विरोध करते. एक स्वीडिश जोडपे दत्तकासाठी आश्रमात येते. त्यांना कर्णच जास्त आवडतो. कुंतीचा विरोधही कळतो. `आपण तिची समजूत घालू` असे आश्वासन सरलाबेन देतात. एक दिवस कुंतीला `तिचा प्रियकर एका गावी लग्नाला आलाय, त्याला गाठ’ असे खोटेच सांगून हिंमतभाईसह दूर गावी पाठवले जाते. हिंमत सूरजमल शेठजींच्या मिलमध्ये नोकर. तसाच हरिराजस्वामींचा विश्वासू सेवक. इकडे कुंतीला कल्पना न देताच कर्णाचे दत्तकविधान आटोपले जाते. त्याचे स्वीडिश माता-पिता लगेचच मायदेशी परततात. निराश होऊन परतताच कुंतीला सर्व प्रकार कळतो. तिला विलक्षण धक्का बसतो. रागही येतो. सरलाबेन निरनिराळ्या तऱ्हेने समजूत घालायचा प्रयत्न करतात, पण कुंती कर्णाला परत आणण्याचा कृतनिश्चय करते. न्याय मागण्यासाठी ती राज्यपालांपासून राष्ट्रपतीपर्यंत अर्ज करीत राहते; पण तिला सरकारी छापील उत्तरे मिळतात. मध्यंतरी हरिराजस्वामी व सरलाबेन यांच्या सल्ल्यामुळे व मध्यस्थीमुळे कुंतीचा हिंमतभाईशी विवाह होतो. हिंमतला कुंतीच्या जीवनातील घटनेची कल्पना असूनही तो तिचा स्वीकार करतो; इतकेच नव्हे तर कर्णाला परत आणण्यासाठी मदतीचे आश्वासन देतो. काही दिवसांनी सरलाबेनना जीवघेणा अपघात होतो. हिंमत व कुंती बडोद्याला हॉस्पिटलात भेटायला जातात. `आपण जगणार नाही` हे लक्षात येताच सरलाबेन कुंतीला, आतापर्यंत लपवलेला कर्णाचा (आता अॅलनचा) पत्ता देतात. त्या मृत्यू पावतात. आता कुंती व हिंमत स्वबळावर कर्णाचा पत्ता हुडकून त्याला आणण्याचे प्रयत्न सुरू करतात. कुंतीचा दुसरा मुलगा `अर्जुन`ही मातेच्या मदतीस तत्पर होतो. कुंतीला कर्णभेटीचे वेड लागते. हरिराजस्वामींच्या संदेशामुळे फालूनला राहणारे धीरेन गांधी महत्प्रयासाने कर्णाला शोधून फोनवर संपर्क साधतात. इतकेच नव्हे तर कुंतीच्या स्वीडन प्रवासाचीही व्यवस्था करतात. कुंती त्यांच्या घरीच राहते. `कर्णाला भेटल्याशिवाय मी अन्न घेणार नाही` असे कुंती ऐकवते. त्या रात्री मोठ्या मुश्किलीने, हिमवर्षाव असताना धीरेनभाई तिला कर्णाकडे नेतात… पण तो कुंतीला `अस्सल माता` म्हणून मान्य करत नाही. तो पूर्ण स्वीडिश बनला आहे. धीरेनभाई त्याला सर्व समजवतात, तेव्हा कुंतीला तासाभरानंतर भेटतो– पण पूर्ण त्रयस्थपणे. मुलगा भेटला यावरच समाधान मानून कुंती परतीच्या प्रवासाला निघते. आश्चर्यकारकरीत्या कर्णाची पत्नी `कोरीन`- ही पण गुजराती दाम्पत्याला दत्तक गेलेली– सासूसह पहिल्या बाळंतपणासाठी भारतात यायला निघते. सर्व एकत्र येतात. सगळे व्यवस्थित झाले हे पाहून हरिराजस्वामी कायमसाठी आपल्या गावी पंजाबात, बटाल्याला जायला निघतात. कुंती, हिंमत, गजेंद्रप्रसाद इ. कुणाच्याच आग्रहाला ते मानत नाहीत. अखेर स्टेशनवर त्यांना सर्व जण साश्रू नयनांनी निरोप देतात.
Reviews
There are no reviews yet.