Description
ही आहे कथा स्वत:चंच आयुष्य विंचरून पाहणा-या एका स्त्रीची, अखिलनंदेश्वरी ऊर्फ अखिला. वय वर्ष पंचेचाळीस. अविवाहित, सरकारी खात्यात कारकून. जगता जगता इतकी ओझी येत गेली खांद्यावर की, तिचं स्वत:साठी जगणं.. स्वत:च्या मर्जीनं जगणं राहूनच गेलं. मुलगी म्हणून, बहीण म्हणून, आत्या आणि मावशी म्हणून ती उष्ट्या संसारांच्या खरकट्यात फक्त पिचत राहिली. हे रहाटगाडगं खरं तर असंच चालू राहायचं; पण एके दिवशी कशी कोण जाणे, स्वत:चीच हाक ऐकून अखिला निघाली.. कन्याकुमारीच्या प्रवासाला– एकटीच. आयुष्यात पहिल्यांदाच मोकळा श्वास घ्यायला… तमिळ ब्राह्मण कुटुंबाने तिच्या अविवाहितपणाभोवती घातलेली कर्मठ रिंगणं तोडून स्वत:च्या मनासारखं जगायला.. स्वत:साठी जगायला.. आयुष्याची वेगळी चव चाखायला. रेल्वेच्या प्रवासात तिला भेटतं एक वेगळंच जग. लेडीज कूपेच्या धावत्या आडोशात भेटतात आणखी पाच जणी. बघता बघता परकेपणाची बंधनं गळून पडतात. सहा जणींच्या आयुष्याच्या सहा दिशा पकडून गाडी भरधाव सुटते. जखमा मोकळ्या होतात. गुपितांच्या गाठी सुटतात. सहा वेगळी आयुष्यं सहा जणींत वाटली जातात. जानकी.. मार्गारेट शांती.. प्रभादेवी.. शीला.. मारीकोलान्थू. लेडीज कूपेमधून प्रवास करताना तिला भेटलेल्या या पाचही जणींना अखिला विचारतेच, `पुरुषांच्या आधाराशिवाय बाई एकटी राहू शकते? सुखाने, आनंदाने जगू शकते? की बाईला पुरुष हवाच असतो शेवटी?
Reviews
There are no reviews yet.